अहमदनगर: देशाला चीन वा पाकिस्तान या शत्रूंपेक्षा सुशिक्षित हिंदूंचा जास्त धोका आहे, असे विधान श्रीशिवप्रतिष्ठान (हिंदुस्थान) प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. रायगड येथे ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्संस्थापना आणि खडा पहारा तुकडी निर्मितीच्या प्रचार-प्रसारासाठी नाशिकमध्ये रविवारी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिडे यांनी म्हटले की, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदू संस्कृती आणि धर्म आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहेत. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो लढा उभारला आणि गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या देवताचे कर्तृत्व समाज विसरत चालला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी भारत देश हिंदवी स्वराज्याच्या कवेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतरही हे कार्य मावळ्यांनी पुढे सुरू ठेवले. अटकेपार झेंडे लावले. १४ वर्षे दिल्लीवर भगव्या झेंड्याने राज्य केले. पण आज हिंदू समाज मरगळला आहे. देशाला चीन वा पाकिस्तान या शत्रूंपेक्षा सुशिक्षित हिंदूंचा जास्त धोका आहे, असे भिडे यांनी म्हटले. यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठाकडून हिंदवी स्वराज्य खडा पहारा ही तुकडी तैनात केली जाईल. यामध्ये दोन हजार धारकऱ्यांचा समावेश असेल व ते रोज गडावर पहारा देतील.
सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. याशिवाय, अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच त्यांनी सभेत मांडला.