शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. परंतु एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी “तू आधी कुंकू लाव मगच बोलतो” असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याची आता महिला आयोगानंही दखल घेतली असून त्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
“साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधीही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते,” असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रियाही दिली.
त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असंही त्या म्हणाल्या. संभाजी भिडे त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडून खुलासा करण्याबाबत नोटीसही पाठवण्यात आली आहे.