महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.
“लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन. फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे, हा फक्त शिवसेनेचा लढा नाही. हा लोकशाहीचा लढा आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जो विचार करुन आपण सोबत आला आहात, तो विचार म्हणजे संविधान वाचवण्यासाठी सोबत आलो आहोत. आपण शिवप्रेमी आहोत, आपल रक्त एकच आहे. एकत्र येऊन आपल्याला नवीन इतिहास घडवायचा असल्याचेही ते म्हणाले.
“आजवरचा जो इतिहास आहे मग तो मराठी माणसांचा म्हणा, मराठ्यांचा म्हणा दुहीचा हा गाढत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाडून टाकू. दुहीचा शाप आजवर आमचा घात करत आला. साक्षीपुरावे गोळा करण्याचे दिवस नाही, पण असं म्हटलं जातं की औरंगजेबानं सांगितलं होतं की मराठ्यांना जगाच्या पाठीवर काही तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती इतकी रुजतात किंवा फोफावतात की हा हा तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळलं होतं. आमची जी काही भूमिका रोखठोक आहे म्हणून एकत्र आलो आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युतीमहाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी देणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे, असं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.