पंढरपूर (जि़ सोलापूर) : राज्यातील भाजपा सरकारविषयी सर्वच समाजघटकांत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड १०० जागा लढवणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभर ५० दिवसांची रथयात्रा काढून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.संघटना बांधणी आणि सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खेडेकर हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत.भीमा-कोरेगाव, औरंगाबाद येथील दंगली सरकार पुरस्कृत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेळ्यासुद्धा आता चोरीस जाऊ लागल्या आहेत. राज्यात अनागोंदी माजलेली आहे. मात्र तरीही भाजपा सरकारवर नाराज झालेले लोक लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळतील असे नाही. शेतकरी, युवक, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न घेऊन ब्रिगेड पुढे जाणार आहे, असेही खेडेकर म्हणाले.
संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १०० जागा लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:14 AM