सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न विचारून मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का? असा सवाल विचारला.
त्यांनी लिहिलं की,''मराठा समाजाने संघर्षाने मिळवलेली आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे. याबाबत प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल करून ती बंदच करून टाकणार आहेत का? तर तसेही सांगा. संबंधित मंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला अपेक्षित आहेत. मराठा समाजाच्या वतीने पुण्यात आंदोलन केलं, तिथे जी आश्वासने सरकारच्या वतीने समाजाला दिली गेली त्यापैकी किती पूर्ण केली?''
ते पुढे म्हणाले की,''पण एखाद्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हातात घेऊन उभी राहत असलेल्या संस्थेचे लगेच पंख छाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. लोकशाही मध्ये समाज सर्वात मोठा असतो. पण तो जागृत असला पाहिजे. जागृत झालेला समाज एकवटतो. एक झालेल्या समाजाची फार मोठी ताकद असते, त्यापुढे मोठमोठ्या सत्तांना झुकाव लागतं. यातूनच मराठा समाजाने, आरक्षण मिळवलं, अनेक संस्था मिळवल्या. अजूनही अनेक गोष्टी समाजाला मिळवता येतील. सारथी च्या बाबतही समाजाला जे पाहिजे तेच होईल. संस्था ज्यांच्या नावाने आहे त्या राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं हे माझं कर्तव्य समजतो. सारथी च्या स्वायत्ततेसाठी आणि मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन करतो.''