ज्ञानेश दुधाडे/बाळासाहेब काकडे, अहमदनगरसिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजण्याची ताकद फक्त संभाजीराजांतच होती, असे संदर्भ अनेकदा दिले जातात. मात्र, त्याच संभाजीराजांच्या शौर्याचा अखेरचा साक्षीदार असणारा श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूर गड आजही उपेक्षितच आहे. राजांचे शौर्यस्थळ आणि शौर्यस्तंभ एवढ्याच काय त्या खुणा येथे शिल्लक आहेत. मोगल राजवटीत सर्वात समृद्ध असणाऱ्या सुभेदारीपैकी पेडगाव होते. सोने-चांदीपासून धान्यापर्यंत ५२ पेठा येथे होत्या. याच ठिकाणी भिमथडीवर ३५० एकरांचा बहादूर गड आहे. किल्ल्याच्या स्थापनेबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते हा गड यादवांच्या कालखंडानंतर, तर काहींच्या म्हणण्यानुसार हा गड मोगल साम्राज्याच्या काळात उभारण्यात आला. औरंगजेबाचा दूधभाऊ येथे किल्लेदार होता. या गडावर अतिप्राचीन अशी पाच मंदिरे आहेत. त्यात तीन महादेवाची, तर जैन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आहे. मोगल राजवटीत या मंदिराची स्थिती उत्तम होती. हा किल्ला आणि संभाजी महाराज यांचा संबंध केवळ त्यांच्या शिक्षेपुरताच आहे. या किल्ल्यात मराठ्यांच्या इतिहासाला नव्हे, तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली. सन १६८९ मध्ये कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी पडकले. त्यावेळी औरंगजेब सोलापूर जिल्ह्णातील अकलूज या ठिकाणी होता. राजांना पकडल्याची वार्ता त्वरित औरंगजेबाला देण्यात आली. त्यानंतर अकलूजपासून जवळ व सुरक्षित असणाऱ्या पेडगावच्या किल्ल्यात राजांना स्थलांतरित करण्यात आले होते. कैदेत असताना मोगलांनी राजांचा अमानवी छळ केला. एकदा राजदरबारात बोलावून औरंगजेबाने संभाजीराजांची चौकशी केली. माझ्या कोणत्या फुटीर सरदारांची तुला साथ आहे, याचा खुलासा करण्याबरोबरच मराठा साम्राज्याचे सर्व गड-किल्ले आहे, त्या खजिन्यासह मोगलांना सुपूर्द करण्याचे फर्मान औरंगजेबाने सोडले. मात्र, तेवढ्याच धारिष्ट्याने राजांनी ते धुडकावून लावले. राजांची तेजस्वी नजर आणि बाणेदार उत्तराने औरंगजेब लालबुंद झाला. याची शिक्षा म्हणून राजांचे डोळे व जीभ छाटण्याचे अमानवी फर्मान औरंगजेबाने काढले, हा इतिहास सर्वश्रृत आहे.
संभाजीराजांच्या बहादुरीचा गड उपेक्षित!
By admin | Published: January 16, 2015 5:39 AM