मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांमध्ये अनेकदा इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेऊन चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना कडक शब्दात इशारा दिला. महाराजांवर आधारित चित्रपट काढण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, असेही ते म्हणाले.
महाराजांची भूमिका कोणीही करू शकतोयावेळी पत्रकारांनी विचारले की, अक्षय कुमार महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यावर संभाजीराजे म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही साकारू शकतो. ज्याचे मन स्वच्छ आहे, तो भूमिका करू शकतो. महाराजांवर आधारित चित्रपट करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल. पण, चुकीचा इतिहास दाखवणार असाल, तर आम्ही कडाडून विरोध करू. मग तो अक्षय कुमार असो वा कोणताही मोठा अभिनेता असो.'
परवानगी घेण्याची गरज नाहीते पुढे म्हणाले की, 'महाराजांवर चित्रपट बनत असेल, तर आम्ही स्वागतच करू. चित्रपट बनवण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, पण चुकीचा दाखवणार असाल तर याद राखा. अशा गोष्टी अनेकदा घडत असतील, तर बोलले पाहिजे ना. सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवणार का. याला काही मर्यादा असायला हव्यात. तुम्ही भालजी पेंढारकरांनी काढलेले चित्रपट पाहा, इतिहासाचा अभ्यास करा.'
चांगले चित्रपटही झाले, त्याचे कौतुक करायला हवे
'संभाजीराजे जेवढा मवाळ आहे, तेवढाच कडकही आहे. मला जेव्हा कडकपणा दाखवायचा असेल, तेव्हा नो कॉम्प्रोमाईज. मी अमरण उपोषण केलेला माणूस आहे. काय करावं आणि काय नाही, हे मला सांगण्याची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराजांना आदर्श मानता, मग असे चित्रपट काढणार असाल, तर किती दुर्दैवी आहे. चांगले चित्रपटही झाले आहेत, त्याचे कौतुक करायला हवे. पण, चुकीची मांडणी खपवून घेतली जाणार नाही,' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.