Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. राज्यभरात भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानांचा स्पष्ट शब्दांत तीव्र निषेध केला जात आहे. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी सुधांशू त्रिवेदी यांनी शिवप्रेमींची माफी मागितलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असे वादग्रस्त विधान केले होते. यासंदर्भातला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यानंतर सुधांशू त्रिवेदी आणि भाजपवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, सुधांशू त्रिवेदींचे वक्तव्य मी नीट ऐकले आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली, असे म्हटलेले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर संभाजीराजे यांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सुंधाशू त्रिवेदींनी शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का करतायत?
देवेंद्र फडणवीस अभ्यासू माणूस आहेत. त्यांनी अशा चुकीच्या विधानाचे समर्थन करू नये. देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळले नाही. अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठराखण करणे अयोग्य आहे. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे समर्थन केल्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सुधांशू त्रिवेदी यांनी शिवभक्तांची माफी मागितलीच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महारांबाबत केलेल्या विधानावर बोलताना संभाजीराजे म्हणाले होते की, राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असे मी परवा सुद्धा म्हटले होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपालपदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा संभाजीराजे यांनी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"