Sambhajiraje Chhatrapati ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी महायुतीत प्रयत्नशील असून महायुतीविरोधात रान पेटवत सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. तसंच राज्यात इतर छोट्या पक्षांकडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. अशातच स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मी घेतलेली भेट ही त्यांना तिसऱ्या आघाडीत येण्याची विनंती करण्यासाठी होती, अशी माहिती संभाजीराजे यांनी धाराशिव इथं पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीविषयी सांगताना संभाजीराजे म्हणाले की, "राज्यात सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं. मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या आघाडीत यावं. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली होती," असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
आरक्षण प्रश्नावरून सरकावर टीका
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. या प्रश्नावरून संभाजीराजेंनी सरकारवर टीका केली आहे. "सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण कोर्टात कसं टिकेल, याबाबत माझ्या मनात शंका आहे. मी राजर्षी शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे राज्य आमच्या हातात आल्यानंतर शाहू महाराजांप्रमाणे आम्हीही आरक्षण देण्याचा प्रयत्न करू," असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये येण्यासाठी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे.