विश्वास पाटील
कोल्हापूर- राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवून मदत करण्याचं आवाहन केले. परंतु कुठल्याही पक्षाने संभाजीराजेंबाबत ठोस भूमिका न घेतल्याने त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.
मात्र या सर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा खुलासा केला आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. त्यावर हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची खेळी होती. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडलं असं त्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर बहुजन समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावं यासाठी भाजपानं जाणीवपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला. जानेवारी महिन्यापासून संभाजीराजे खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. दीर्घकाळ लढाई करावी लागेल. हा संघर्ष खूप मोठा आहे असंही छत्रपती शाहूंनी म्हटलं.
नेमकं काय आहे प्रकरण?राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत लढण्यावर संभाजीराजे ठाम होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) संभाजीराजेंना ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली होती. महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असल्याने संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली होती. पण ही अट त्यांनी अमान्य केल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर विरोधकांनी शिवसेनेने छत्रपतींना विरोध केल्याची चर्चा सुरू झाली.