राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीचा ‘सेफ गेम प्लॅन’; शिवसेना तिढा कसा सोडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:34 AM2022-05-19T11:34:55+5:302022-05-19T11:35:43+5:30

राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे असं अजित पवारांनी सांगितले.

Sambhaji Raje Chhatrapati: NCP's 'Safe Game Plan' for Rajya Sabha seat; How will Shiv Sena solve this problem? | राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीचा ‘सेफ गेम प्लॅन’; शिवसेना तिढा कसा सोडवणार?

राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीचा ‘सेफ गेम प्लॅन’; शिवसेना तिढा कसा सोडवणार?

googlenewsNext

मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण रंगलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवत पाठिंबा देण्याचं आवाहन केले आहे. शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा देऊ असं विधान केल्यानंतर शिवसेनेने मात्र त्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

याबाबत अजित पवार(Ajit Pawar) पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यसभेच्या ६ जागा आहेत. त्यात भाजपाच्या २, शिवसेना १, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागा निश्चित निवडून येतील. पण त्याव्यतिरिक्त सगळ्यांकडे काही मते शिल्लक आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे १ जागा असताना शिवसेनेने मोठे मन दाखवत राष्ट्रवादीला एक जागा सोडली होती. तेव्हा शरद पवारांनी(Sharad Pawar) पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला २ जागा देण्याचं कबूल केले होते. अलीकडेच शरद पवार, उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांची बैठक झाली आहे. त्यात याबाबत चर्चा झाली असावी. कुणी किती जागा लढवायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. १० सूचक जे आणतील ते जागा लढवू शकतात. संभाजीराजेंना(Chhatrapati Sambhajiraje)  पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांशी कुठलेही चर्चा झाली नाही. सर्वोच्च नेते बोलतील असंही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले शरद पवार?

राज्यसभा निवडणुकीतील निकाल हे त्या त्या पक्षाच्या संख्याबळावर अवलंबून असतात. आम्ही या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चर्चा केलेली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अतिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ. शिवसेनेकडेही काही अतिरिक्त मतं आहेत. काँग्रेसकडेही संख्याबळ आहे. अशाप्रकारे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याव्यतिरिक्तची अतिरिक्त मतं आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले होते.

शिवसेनेची भूमिका काय?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. शिवसेना या निवडणुकीत २ उमेदवार उतरवणार असल्याने सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा मग त्यांना राज्यसभेची जागा देऊ असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत २ भूमिका असल्याचं सिद्ध झालं. यात राष्ट्रवादीने शिवसेनेच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. त्यामुळे एकीकडे शरद पवारांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला तर दुसरीकडे अजित पवारांनी शिवसेनेवर निर्णय सोडल्यानं राष्ट्रवादीने सेफ गेम खेळला असल्याची चर्चा आहे.

Web Title: Sambhaji Raje Chhatrapati: NCP's 'Safe Game Plan' for Rajya Sabha seat; How will Shiv Sena solve this problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.