Sambhajiraje Chhatrapati on Gautami Patil Surname Issue: आताच्या घडीला गौतमी पाटील हिची जोरदार चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरणच जणू झाले आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. ज्या गौतमी पाटीलची हवा तरुणाईमध्ये आहे, त्या गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते. गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गौतमी पाटीलने यापुढे पाटील हे आडनाव वापरू नये, अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. यावर संभाजीराजेंनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
मी या मताचा आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळाले पाहिजे. मी या मताचा आहे. बाकीच्या राज्यात जातीवर राजकारण चालते. जाती विषमता जर कमी करायची असेल बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक या अशा राजकारणाला कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा, यासाठी लोक अपेक्षा करत आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाटील आडनावाबाबत अनेकांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. हे का बोलतात ते मला माहिती नाही. परंतु, पाटील हे आडनाव केवळ मराठा समाजात नाही, तर अनेक समाजातील लोकही पाटील आडनाव लावतात. पाटील हा किताब आहे. मी त्याबाबत काही बोललो, तर विषय वेगळीकडे जाऊ शकतो, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.