मी माझ्या कारकिर्दीत राजकारण विरहित काम केलं आहे. कोणता पक्ष आणि कोणतीही संघटना पाहिली नाही. फक्त समाजहित पाहिलं. समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन आजवर भाजपासोबतच महाविकास आघाडीचीही बाजू घेतली आहे. त्यामुळे आता मला राज्यसभेवर जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, अशी साद घालत माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांनी 'गुगली' टाकली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत यंदा कोणत्याही पक्षाकडून उभं न राहता अपक्ष उभं राहण्यासाठी संभाजी राजेंनी महत्वं का दिलं? याचा विचार केला तर त्यांनी राजकीय गणितांची जुळवाजुळव करत महाविकास आघाडी आणि भाजपालाही कोंडीत टाकलं आहे असं म्हणावं लागेल.
राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजी राजे राज्याच्या राजकारणात सक्रियपणे सहभाग घेऊन नवा पक्ष काढतील अशी चर्चा होती. पण या सर्व चर्चांना पूर्णविराम देत संभाजी राजेंनी थेट अपक्ष उमेदवार म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करत सर्वपक्षीयांना सहकार्याचं आवाहन केलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी पाच जागा शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहज निवडून आणू शकतात अशी राजकीय गणितं सध्याची आहेत. पण सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. सहावी जागा कोणताही पक्ष निवडून आणू शकत नाही असा दावा यावेळी संभाजी राजे यांनी केला. याच सहाव्या जागेसाठी माझा अपक्ष उमेदवार म्हणून विचार व्हावा आणि सर्वांनी सहकार्य करुन मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवावं असं राजकीय डावपेच संभाजी राजेंनी आखला आहे.
राज्यसभेचा उमेदवार म्हणून जिंकून येण्यासाठी ४१ मतं हवी आहेत. महाविकास आघाडीकडे जादाची २७ मतं आहेत. तर भाजपाकडे २२ जादा मतं आहेत. त्यामुळे सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला तर संभाजी राजेंचा पुन्हा एकदा राज्यसभेचा राजमार्ग मोकळा होत आहे. यासाठी संभाजीराजेंनी आणखी एक खेळी खेळली आहे, पक्ष न काढता संघटना काढण्याची. पक्ष काढला तर राजकारण आड येईल आणि महाविकास आघाडी, भाजपची जादाची मते मिळणार नाहीत. हा पाठिंबा मिळवून राज्यसभेत गेले तर भविष्यात पक्षही काढता येईल. मग कोणत्याही पक्षाची आडकाठी राहणार नाही.
दरम्यान, संभाजी राजे २००९ साली कोल्हापूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाले होते असाही दाखला इथं देता येऊ शकेल. पण त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता मराठा आरक्षणाच्या मुद्दा संभाजी राजेंनी लावून धरल्यामुळे ते या समाजासाठीचा एक चेहरा बनले आहेत ही गोष्ट देखील खूप महत्वाची आहे.
संभाजी राजे छत्रपतींनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सक्रियपणे पुढाकार घेतला आहे. तसंच छत्रपती घराण्याचा वारसदार म्हणून संभाजी राजेंना राज्यात सन्मान आहे. अशावेळी संभाजी राजेंना पाठिंबा न दिल्यास राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो याची काळजी आता महाविकास आघाडीला अर्थात राष्ट्रीय राजकारणाचा विषय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपालाही त्यांना नाकारता येण्यासारखी स्थिती सध्या नाही. सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून जो गदारोळ सुरू आहे, ते पाहता शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भाजपा मराठा मतपेढी गमवायचे धाडस करणार नाही. यामुळे दोन्ही आघाड्या, पक्षांपुढे इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी अचूक गुगली संभाजी राजेंनी आज टाकली आहे. आता ती खरंच यशस्वी ठरणार की संभाजी राजे क्लीनबोल्ड होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.