मुंबई-
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेनं दिलेल्या पक्ष प्रवेशाची अट फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हाती शिवबंधून बांधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवावी अशी ऑफर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. पण त्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याची माहिती आता समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संभाजीराजे यांना उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. पण ते संभाजीराजेंनी नाकारलं आहे. त्यामुळे सहाव्या जागेचा तिढा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संभाजीराजे छत्रपती अजूनही आपण शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करावी या अटीवर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेनं दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आता मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार असल्याचंही बोललं जात आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना फोनकरुन उद्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी येण्याचा निरोप दिला. राज्यसभेत जायचं असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट शिवसेनेकडून घालण्यात आली. शिवसेनेची ही अट संभाजीराजे यांनी नाकारली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपतींमध्ये आज विशेष बैठक झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. तब्बल पाऊणतास संभाजीराजेंसोबत या बैठकीत चर्चा झाली. याआधीही संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत प्रवेशाची अट संभाजीराजेंना घातली होती. त्यावेळी संभाजीराजेंनी मला शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार घोषीत करा अशी भूमिका घेतली होती.