Sambhajiraje Chhatrapati News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुती यांना सक्षम पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सध्या ज्याप्रकारचे राजकारण सुरू आहे, त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच आम्ही सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास आहे की, मतदार आम्हाला साथ देतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करतील. तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाबाबत आम्ही सर्व नेते बसून निश्चित चर्चा करू. संपूर्ण २८८ जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
त्यानंतर आठ-दहा दिवस झोप लागली नव्हती
विशाळगडवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले होते. ते काढण्याचा माझा प्रयत्न होता. पण मी तिथे पोहोचायच्या आधीच बऱ्याच उलटसुलट गोष्टी घडल्या होत्या. पण माझा काहीही संबंध नसताना राजकीय लोकांनी मला लक्ष केले. राजकीय नेत्यांनी मला जबाबदार धरल्यानंतर त्याचे मला खूप वाईट वाटले. ज्या घराण्यात माझा जन्म झाला आहे, त्याच घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले. मात्र, तरीही सगळ्यांनी माझ्यावर संशय घेतला. त्यानंतर आठ-दहा दिवस मला झोपही लागली नव्हती, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तिसरी आघाडी आकार घेत आहे. तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत काही परिणाम दिसेल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता. राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले की, मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार. संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा चिमटा काढत मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली.