संभाजी राजेंनी उपोषण करू नये; मुंबईत बैठक घेऊन चर्चा करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 03:07 PM2020-01-10T15:07:42+5:302020-01-10T15:24:41+5:30
भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही.
पुणे : मराठा समाजातील मुलांसाठी काम करणारी सारथी संस्था वाचविण्यासाठी शनिवार (दि.11) रोजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणास बसणार आहे. त्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, सारथी संस्थे बाबत दोन बाजूसमोर येत आहे. या संस्थेत भष्ट्राचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी सचिवाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी देखील यावे. असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यापूर्वी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्या उमेदवाराची मुलाखत घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला.
जिल्हा परिषद हे राजकारणातील शक्तीस्थळ आहे. कारण येथून आमदार खासदार होतात, भविष्यात जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला दिला जाईल. मात्र होणारी विकास कामे ही दर्जेदारच झाली पाहिजे. त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद सदस्यांना दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पवार यांनी घेतल्या यावेकी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.