Sambhajinagar: ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. या स्थगितीनंतर, संजय राऊतांसह अनेक नेतेमंडळींनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याचे म्हटले. पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या विषयावर स्पष्टीकरण दिले. ठाकरे सरकारने जेव्हा हे निर्णय घेतले होते त्यावेळी त्यांचे सरकार अल्पमतात होते. त्यामुळे हे निर्णय स्थगित करून उद्याच्या कॅबिनेटमध्ये पुन्हा नव्याने निर्णय घेणार अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. दोनशे तिनशे निर्णय घेतले. ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन नामांतरावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर अखेर नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
बंडखोरी करण्याबाबतच्या निर्णयावरही त्यांनी मत व्यक्त केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पुण्याच्या रस्त्यावर पंढरपूरला जाताना माझं स्वागत करत होते. लोकांच्या भावना बघितल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे सगळं करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही तर पन्नास लोक माझ्यामागे आहे. मला मुख्यमंत्री करणार असं सांगत होते. पण मी मुख्यमंत्री पदासाठी आलोच नव्हतो. आपला पक्ष मोठा करण्यासाठी आणि आपल्या माणसांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे म्हणून मी आलो, असेही यावेळी एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले.