Chhatrapati Sambhajinagar Violence : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिसरात असलेल्या राम मंदिराजवळ दोन गटात वाद पेटला आणि या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी अनेक गाड्या जाळण्यात आल्या. तसेच, दुकानांची तोडफोडही झाली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अनेल बोंडे यांनी या दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप केला आहे.
एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे. ज्या भागात ही दंगल पेटली, त्या भागात हिंदू राहत नाही. त्यामुळे या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीचा स्थानिक नेता आणि एमआयएमच्या नेत्यातील भांडणामुळे ही घटना घडली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सांभळण्यात सक्षम असल्यामुळे प्रकरण तात्काळ शांत झाले,' असे अनिल बोंडे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'रामनवमीच्या आदल्या दिवशी खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचा नेता मौलाना कादीर याचा मुलगा रियाजुद्दीन याचे भांडण झाले. इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी तिथे रियाजुद्दीनचे लोक आले होते. त्यामुळे जलील यांनी बचावासाठी राम मंदिराचा आसरा घेतला. जलील मंदिरातून बाहेर येत नव्हते, त्यामुळे रियाजुद्दीनच्या लोकांनी मंदिरासमोर असलेल्या मुस्लिम समाजातील लोकांच्या दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक तिथे आले आण हा हिंसाचार घडला.'
'इम्तियाज जलील आणि मौलाना अब्दुल कादिर यांच्यामधील भांडणामुळे ही एवढी मोठी घटना घडली. याची सुरुवात मौलाना अब्दुल कादिर याचा मुलगा रियाजुद्दीने केली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना कादिर आणि रियाजुद्दीचे फोन कॉल चेक करावे. कोणाच्या सांगण्यावरुन ही दंगल भडकवली, याची चौकशी करावी. हा वाद दोन मुस्लिम गटामध्ये झाला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने याला वेगळा रंग दिला. या घटनेच्या मागे मोठा हात आहे. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठीच दंगल भडकवण्यात आली,' असा आरोप बोंडे यांनी केला आहे.