- विश्र्वास पाटील
कोल्हापूर, दि. ११ - मराठा आरक्षणासाठी राज्यभर केलेले दौरे, त्यातून मोठ्या प्रमाणात तरुणांचे संघटन आणि छत्रपती शाहू घराण्याची पुण्याई हीच संभाजीराजे यांना खासदार करण्यात कारणीभूत ठरली. लोकसभेला पराभव झाल्यानंतर ते पक्षीय राजकारणापासून बाजूला पडले तरी सामाजिक कार्यात सक्रीय राहिले. मी जे काम करत आहे, ते योग्य असेल तर राजकीय पक्ष त्याची कधी ना कधी दखल घेतील अशी भावना ते व्यक्त करत राहिले. घडलेही तसेच. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील व राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस संधी देवून भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयातून शनिवारी रात्री प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. सोळा राज्यातील राज्यसभेच्या ५८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.त्याचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. व त्यानंतर लगेचच राष्ट्रपती नियुक्ती सदस्याच्या एका रिक्त जागेवर संभाजीराजेंची नियुक्ती करण्यात आली. गेल्या महिन्यात राष्ट्रपती नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात आली होती.त्यामध्ये डॉ. प्रणव पंड्या यांचा समावेश होता मात्र त्यानी राज्यसभेचे सदस्यत्व स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे ही जागा रिक्त होती.संभाजीराजे यांच्या नियुक्तीचा भाजपला किती राजकीय लाभ मिळेल ही लांबची गोष्ट असली तरी भाजपचे पश्चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष असल्याचेही या नियुक्तीने अधोरेखित केले. त्यांची नियुक्ती सामाजिक काम या निकषावर झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचा उमदे, तरुण आणि राजर्षि शाहू घराण्याचा वारसा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या २००९ च्या निवडणूकीत संधी दिली. त्यावेळी उमेदवारी देताना पक्षाना बराच घोळ घातला. संभाजीराजे यांच्यासह धनंजय महाडिक व दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्यात रस्सीखेच झाली. त्यात संभाजीराजे यांनी बाजी मारली. दोन्ही काँग्रेसचे प्राबल्य असल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार आणि संभाजीराजे निवडून येणार असे चित्र पहिल्या टप्प्यात तयार झाले. परंतू पुढे या लढतीला तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यानी भावनिक स्वरुप दिले. त्यांनी संभाजीराजे यांच्यापेक्षा ही लढत शरद पवार यांच्या विरोधातील लढाई या वळणावर नेली.त्यात महाडिक कुटुंबियांनीही त्यांना मदत केली. त्यामुळे या सगळ््याचा परिणाम म्हणून संभाजीराजे हे४४ हजार८०० मतांनी मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले. लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर ते सुरुवातीला कांही दिवस राष्ट्रवादीत सक्रीय राहिले. परंतू त्यांना पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा अत्यंत वाईट अनुभव आला. पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे कधीच सुत जुळले नाही.त्यामुळे त्यांनी राजकारणातून बाजूला होवून सामाजिक कार्याकडे लक्ष दिले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यभर मेळावे घेतले. या मेळाव्यांना मुख्यत: मराठवाडा, विदर्भात तरुणांचे पाठबळ मिळाले. रायगडावर गेली अकरा वर्षे ते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत. त्यातूनही त्यांची प्रतिमा उंचावली. त्यामुळे लोकसभेच्या गत निवडणूकीतच त्यांच्या उमेदवारीची शिवसेनेकडून जोरदार हवा होती. त्या पक्षाने त्यांना त्यासंबंधी थेट विचारणाही केली होती परंतू त्यांनी आपण सामाजिक कामातच खुश असल्याचे सांगून ही संधी नाकारली.यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ््यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे यासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्याचदिवशी राज्यसभेच्या उमेदवारसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती.
असे आहेत संभाजीराजे...नाव : युवराज छत्रपती संभाजीराजेजन्मतारीख : ११ फेब्रुवारी १९७१शिक्षण : सायबर कॉलेजमधून एमबीएपत्नी : छत्तीसगडच्या युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती.मुलगा : युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती (सध्या पुण्यातील सिम्बायसिस महाविद्यालयात बारावीत शिकतो)पदे : पुण्यातील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष,कोल्हापुरातील भवानी मंडपातील छत्रपती चॅरिटेबल ट्र्स्टचे अध्यक्ष,शिव-शाहू मंच व सह्याद्री प्रतिष्ठानचे चिफ पेट्रन,राजकीय कारकिर्द : संभाजीराजे तसे कोणत्याच पक्षाचे सुरुवातीला सक्रीय कार्यकर्ते नव्हते. त्यांचे भाऊ युवराज मालोजीराजे काँग्रेसकडून आमदार झालेतरी ते त्या पक्षातही कधी सक्रीय नव्हते. लोकसभेच्या २००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे बंडखोर नेते सदाशिवराव मंडलिक यांना शह देण्यासाठी नवीन चेहरा व शाहू घराण्याचाच वारसदार म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसक डून उमेदवारी मिळाली परंतू त्यामध्ये त्यांचा मंडलिक यांच्याकडून ४४ हजार ८०० मतांनी पराभव.