Maharashtra Politics: राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून शिंदे गटाविरोधात बॅनर हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी महाविकास आघाडीने महामोर्चा काढत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा नॅनो मोर्चा होता, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. यानंतर संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मात्र, आता या व्हिडिओवरून संभाजीराजे छत्रपती संतापले असून, संजय राऊतांना सुनावले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो म्हणणे चुकीचे आहे, त्यांच्याकडून अशी टीका अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा किती विशाल होता हे दाखवणारा व्हिडिओही ट्विट केला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून, मराठा मोर्चाचा असल्याचे सांगितले. यानंतर संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
जरा तरी तमा बाळगा, या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच
संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, संजय राऊत ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा !, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही तोच व्हिडओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत 'एक मराठा, लाख मराठा' तसेच छत्रपती 'शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा स्पष्ट ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना पाटील म्हणाल्या की, महाविकास आघाडीचा विराट मोर्चा ड्रोन मधून पहायचा होता पहा उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुष के सन्मान मै महाविकास आघाडी मैदान मैं. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी रुपाली ठोंबरे पाटलांना चांगलंच खडसावले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"