Gram Panchayat Election Result: राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढविली गेली नसली तरी विजयानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे भाजपने क्रमांक एकच्या जागा पटकाविल्याचे चित्र आहे. यातच या निवडणुकीत मैदानात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली.
स्वराज्य संघटना आजही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. काही लोक स्वयंपूर्तीने स्वराज्य संघटनेच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेत आहेत, आणि लोकांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वराज्य संघटने राजकारणात यावे अशीच इच्छा लोकांची असल्याचे दिसून येते, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
त्यांच्या पाठीशी भक्कम पणे आम्ही उभे राहू
यातून अधिक जोमाने काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत आहे. जे लोक आमच्यासोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू, असे आश्वासनही संभाजीराजे यांनी दिले आहे. तसेच पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षीत यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेचे ८९ ग्रामपंचायत सदस्य आणि १३ सरपंच निवडून आले. यामध्ये कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड, लातूर, अहमदनगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
दरम्यान, राज्यात निवडणूक लागलेल्या ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीपैकी भाजपने एकूण २ हजार ०२३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादी राँग्रेसने १ हजार २१५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. तर शिंदे गट ७७२, काँग्रेसने ८६१, ठाकरे गट ६३९ तर इतर पक्षांनी १ हजार १३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"