Sambhaji Raje Chhatrapati Mahayuti Maha Vikas Aghadi : अंतरवाली सराटी येथे अन्न-पाण्याचा त्याग करत मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची आज भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबद्दल संभाजीराजेंनी चिंता व्यक्त केली. "ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असाल", असा इशारा संभाजीराजेंनी महायुती सरकारला दिला.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. त्याच्या तब्येतील चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी महायुतीबरोबरमहाविकास आघाडीला सुनावले.
"कॅबिनेट आहे ना, मग घ्या ना निर्णय"
संभाजीराजे म्हणाले, "मला दुःख वाटतं. वेदना आहेत की एवढी तब्येत खालावून सुद्धा हे सरकार मुंबईला एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसले आहे. विरोधी पक्षातील लोकं सुद्धा निवांत जे वातावरण तयार होत आहे, त्याकडे बघ्याची भूमिका घेत आहे. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, मग घ्या ना निर्णय. हो किंवा नाही म्हणून टाका", अशी विचारणा संभाजीराजेंनी सरकारला केली.
"मी दोघांनाही जबाबदार धरतो. पहिले सरकार आणि दुसरे विरोधी पक्षनेते. तुम्ही एकत्र येऊन सांगा की देऊ शकता की नाही देऊ शकत. तिकडे पलिकडे बसायचे आणि मनोज दादा... मनोज दादा म्हणायचे. हे काही बरोबर नाही", अशा शब्दात संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला.
जरांगेंचा लढा प्रामाणिक असतो -संभाजीराजे
"महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढं आंदोलन होतंय. कुणासाठी स्वतःसाठी, माझी मनोज जरांगेंशी कितीतरी वर्षांपासून ओळख आहे. मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा असतो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो. सरकारलाही सांगू इच्छितो की, ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता", असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"आपण जे फुले-शाहू-आंबेडकर नाव घेतो, त्यात या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. म्हणून पुर्वीसुद्धा मी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर होतो. आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्याबरोबर असणार आहे", अशी भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली.
मनोज जरांगेंच्या प्रकृतीवरून संभाजीराजे महायुती-महाविकास आघाडीवर बरसले
"सरकारला माझी सूचना आहे की, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या. लिव्हर, किडन्यांची स्थिती काय आहे, देव जाणे. ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले आहे. याचे तुम्हाला जराही गांभीर्य नसेल, तर मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय? विरोधी पक्षातील लोकांना सुद्धा मला हेच सांगायचे आहे की, तुम्ही वर्षभर पटापट इथे आले. आता तुम्ही सगळे कुठे आहात? आता तुमची राजकारणाची वेळ आली. विधानसभा आली म्हणून आता मनोज जरांगे पाटील नकोय? हा मराठा समाज नको, हा बहुजन समाज नको. हे चालणार नाही. हे अजिबात चालणार नाही", असा इशारा संभाजीराजेंनी महायुती, महाविकास आघाडीला दिला.