मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिले. यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली. ही चर्चा राज्यसभा निवडणुकीबाबत झाली की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली, हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, या भेटीवर तर्क-वितर्क लावले जात आहेत.
संभाजीराजेंचे आमदारांना खुलं पत्रराज्यसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा असे खुले पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिले आहे. आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत सहावी जागा निवडून आणण्यासाठीचे पुरेसे संख्याबळ कोणत्याही एका राजकीय पक्षाकडे नाही. सर्व राजकीय पक्षांनी व अपक्ष आमदारांनी आपल्याला संधी द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
भाजपात अंतर्गत सहमती नाहीपहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपचे दोन, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्की निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. संभाजीराजे छत्रपती यांना या सहाव्या जागेसाठी पाठिंबा देण्यावरून भाजपत अंतर्गत सहमती नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
स्वराज्य संघटनेची घोषणा!गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. या संघटनेचे नाव स्वराज्य असे ठेवले आहे. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते की, मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचे नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे.