Sambhajiraje Chhatrapati : खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून आज त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका फडणवीसांसमोर मांडली.
"मी देवेंद्रजींना हात जोडून विनम्रपणानं सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण समाजासाठी एकत्र येऊ. आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही. तर जे काही समाजाचे होईलं त्याला तुम्ही-आम्ही सर्व जबाबदार ठरू", असं फडणवीसांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
"मी देवेंद्रजींना सांगितलं की आता आपल्याला मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर राजकारणापलिकडे विचार करायला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते या सर्वांनी एकत्र यायला हवं. नम्रतेने हात जोडून मी त्यांना सांगितलं की माझं-तुझं करण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊ आणि समाजाला न्याय देऊ. कारण आता न्याय दिला नाही. तर या समाजाचं काय होईल याला जबाबदार बाकी कोणी नसेल. त्याला माझ्यासकट हे सगळे नेते मंडळी, खासदार, आमदार हे जबाबदार असतील", असं संभाजी राजे म्हणाले.
दरम्यान, खासदार संभाजीराजे भोसले यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर संभाजी राजे यांनी राज ठाकरेंनी भूमिकेला समर्थन दिल्याची माहिती दिली होती. शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉइंट असल्याचं संभाजी राजे म्हणाले होते. राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही कायम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती संभाजीराजे यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.