Sambhajiraje Chhatrapati : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी धक्कादायक दावा केला होता. आग्र्याहून सुटकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन सुटका करुन घेतली असं विधान राहुल सोलापूरकर यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. मात्र टीकेनंतर राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. दुसरीकडे, संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा अशी मागणी केली आहे.
"हल्ली कुणीही उठून आपापल्या आकलनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे. इतिहासाची प्रतारणा होईल, लोकभावनेस ठेच लागेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, याचे कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा. शासनाने शिवचरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भांवर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करावा, जेणेकरून शिवचरित्रावरील व्याख्याने, मालिका, नाटक, चित्रपट आदी सर्व साहित्यांस हा शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही. याविषयी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी. मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे," असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
"महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितले गेले. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही,” असं सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं.