Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य करताना थेट इशारा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा दोन महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा त्यांनी अवमान केला होता, कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची घडी त्यांनी मोडली. रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहे, त्या नव्या राज्यपाल यांना शुभेच्छा आहे. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, महापुरुषांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्य चालते आहे त्यामुळे त्याबाबत नव्या राज्यपाल यांना माहिती असायला हवी, असा सल्ला संभाजीराजेंनी दिला.
राज्यपालांचा राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण
जुन्या राज्यपाल यांनी ज्या चुका झाल्या त्या चुका नव्या राज्यपाल यांनी करू नये, महाराष्ट्राबद्दल दुसरीकडे माहिती द्यावी, महाराष्ट्रात असलेल्या महापुरुषांचा इतिहास दुसरीकडे प्रसारित करायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, राज्यपाल यांचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना सांगितले तेव्हा का निर्णय घेतला नाही, महाराष्ट्रात किती गदारोळ झाला तरी राजीनामा घेतला नाही, त्यांना कोणी पाठीशी घातले आहे सर्वांना माहिती आहे. यापुढील काळात जर काही चुका झाल्या तर आम्ही ठोकणार, स्वराज्याच्या माध्यमातून आम्ही ठोकणार, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
दरम्यान, यापूर्वी राज्यपाल यांना पदावरून हटवा अशी मागणी करताना, संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका मांडत जोरदार टीका केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर आता संभाजीराजे यांनी नव्या येणाऱ्या राज्यापालांनाही इशारा दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"