मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील वाटाघाटी काही अंतिम रूप घेऊ शकली नाही. शिवसेनेने आधी शिवबंधन मगच उमेदवारी मिळेल अशी कठोर भूमिका घेतली आहे. यातच छत्रपती संभाजीराजे यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. ही ऑफर काही संभाजीराजेंनी स्वीकारलेली नाही.
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा नवा पर्याय समोर आला असला तरी त्यावरही एकमत झालेले नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते खा. अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेल ट्रायडन्ट येथे संभाजीराजे यांची भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली. खा. संजय राऊत यांनीही संभाजीराजे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. राजे, उद्या शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप राऊत यांच्याकरवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना दिला असताना संभाजीराजे अचानक आज पहाटेच कोल्हापूरला निघून गेल्याचे समजते आहे.
आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही; मग ते कुणीही असो, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
यामुळे संभाजीराजे शिवसेनेची ऑफर स्वीकारणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. संभाजीराजेंना शिवसेनेच्या अनेक गोष्टी बंधनकारक रहावे लागले असते. शिवाय शिवसेना पुरस्कृत उमेदवार असेही झाले असते. या साऱ्या घडामोडींवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे ठरले आहे. शिवसेनेसोबत मराठा क्रांती मोर्चाची बैठक होणार असे काही ठरलेले नाही असे सांगितले.
संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजेंनी जादाची मते आपल्याला देण्याची विनंती केली होती. परंतू, सहावी जागा शिवसेनेची असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करत, शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे सूचित केले होते. एबीपीने याबाबतचे वृत्त दिले आहे.