संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुण्यात मोठी घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आजपासून मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे जाहीर केले. याचबरोबर राजकारणाच्या प्रवासाचे पहिले पाऊल म्हणून स्वराज्य संघटनेची घोषणा केली आहे. तसेच यावेळची राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असून त्यांनी मतांचे समीकरणही जाहीर केले आहे. यामुळे संभाजीराजे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
BREAKING: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना, राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार!
राज्यसभेत जाण्यासाठी महाविकास आघाडी, भाजपाने मदत करावी. राजकारणविरहित काम केले, कोणता पक्ष, कोणती संघटना हे पाहिले नाही. रायगडासाठी फिरलो, समाजासाठी फिरलो. लोकांनी गेल्या काही दिवसांत राजे, नवा पक्ष स्थापन करा अशी मागणी केली होती. त्यांचे आभार. तिसरी आघाडी असावी असेही त्यांचे मत होते. परंतू, मी आज स्वराज्य संघटित करणार आहे, असे म्हणत स्वराज्य संघटनेची स्थापना करत असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
लोकांना स्वराज्याच्या नावावर संघटित करण्यासाठी मी आज स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. माझा सामाजिक प्रवास सुरु केला तेव्हा लोकांची मागणी होती की तिसरी आघाडी स्थापन करावी, राजे वेगळा पक्ष स्थापन करावा, अशी मागणी केली जात होती. त्यांचे आभार. सोशल मीडियातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. परंतू माझा राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा हा स्वराज्य संघटित करण्याचा असणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्षात रुपांतरीत झाले तरी त्यात वावगे समजू नये. माझी त्यासाठी तयारी आहे. मे महिन्यात मी महाराष्ट्राचा दौरा असणार आहे, अशी घोषणा संभाजी राजे यांनी करत महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केल्याचे जाहीर केले आहे.
'...तर मी लोकसभाही लढवेन तेही कोणत्याही मतदार संघातून'; संभाजी राजे थेट बोलले!
राज्यसभेत कसे जाणार? मांडले मतांचे गणित...
२०२२-२०२७ पर्यंत मी समाजासाठी वाहून घेतले आहे. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता हवी. राज्यसभेचे ३ भाजप, १ राष्ट्रवादी, १ काँग्रेस, १ शिवसेना असे आधीचे समीकरण होतं. आता हेच समीकरण २ भाजप, आणि इतर १ असं आहे. या वेळी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असेही संभाजीराजेंनी जाहीर केले.
याचबरोबर संभाजीराजेंनी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांच्या मतांचे गणितही सांगितले आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सहापैकी पाच जागा आरामात निवडून येतील असे संख्याबळ आहे. परंतू सहावी जागा कोणताही पक्ष निवडून आणू शकत नाही. जिंकण्यासाठी ४२ मते हवी आहेत. महाविकास आघाडीकडे जादाची २७, भाजपकडे २२ मते आहेत. यामुळे या पक्षांनी मला अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली. आता हे पक्ष संभाजीराजेंना पाठिंबा देतात का, हे पुढील काळात स्पष्ट होईल.