ठळक मुद्देआरक्षण गेलं खड्ड्यात, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायुवकाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया
कोल्हापूर : कॉलेजसाठी प्रवेश न मिळाल्याने मराठा विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘आरक्षण गेलं खड्ड्यात; सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत द्या’ अशी त्यांनी मागणी केली असून, त्यांच्या या ट्विटमुळे आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
उस्मानाबाद येथील देवळालीचा मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे ‘आता आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,’ अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.संभाजीराजे म्हणाले, समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील किंवा विरोधी पक्षातील नेते असोत. ‘योग’ करीत आपण दोन मिनिटे शांत बसून विचार करू, की आपण का म्हणून राजकारणात आलो आहोत? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय? भाषणात बोलताना देशहित, समाजहिताच्या गोष्टी आपण करीत असतो; परंतु वास्तवात आपलं आचरण त्या प्रकारचं आहे का? की उगाच मुॅँह में राम, बगल में छुरी असा प्रकार चालू आहे ? नाही तर आज एवढा हुशार विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर आता खरी सुरुवात होती, असे उद्विग्न मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्यामुळे आपलं आज जिवंत असणे सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वत:ला संपवत आहेत? आपल्या ‘व्यवस्थे’तच मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्यांच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे आहेत.यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षच नाही, असे समजू नका. ‘शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये,’ असे शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते, याची आठवणही संभाजीराजेंनी करून दिली आहे.