मुंबई - दिल्लीमध्ये भाजपा नेत्यांनी प्रसिद्ध केलेले आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झालेला आहे. या पुस्तक प्रकाशनामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपात गेलेल्या वंशजांना हे मान्य आहे का? असा सवाल केला त्यावरुन छत्रपती संभाजी राजेंनी संतप्त व्यक्त केला आहे.
याबाबत ट्विट करुन संभाजी महाराजांनी लिहिलं आहे की, प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण केलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घातली पाहिजे. त्यांनी असं म्हणण्यापूर्वी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तर त्यावरुन संजय राऊतांनी पुन्हा संभाजी महाराजांना सवाल केला आहे. मा.छत्रपती संभाजी राजे, आम्ही आपला नेहमीच आदर करतो..संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ?ज्या मुळे छत्रपती घराणयाचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल.धन्यवाद आणि जय महाराष्ट्र असं ट्विट राऊतांनी संभाजी महाराजांच्या ट्विटला दिलं आहे. त्यामुळे भाजपाने आणलेल्या या पुस्तकावरुन महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वाद होताना चित्र दिसत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुस्तकावर तातडीनं बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत ते म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींची तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. भाजपाच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचेही एक खासदार उपस्थित होते. या पुस्तकावर राष्ट्रीय अध्यक्षांनी ताबडतोब बंदी आणली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे हे बोलण्याचा मला अधिकार आहे,' अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.