- विनोद ढोबळविडा (बीड) : जावयाला गाढवावरून मिरवण्याची येथे ८० वर्षांपासून परंपरा आहे. यंदा मात्र जावयाऐवजी गाढवाला शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. जवळच्या गावातून पैसे देऊन आणलेल्या गाढवावर जावयाची मिरवणूक काढली खरी; पण गोंधळामुळे भेदरलेले गाढव अर्ध्या रस्त्यातच खाली बसले. त्यामुळे गावातील तरुणांनी आपल्या खांद्यावर जावयाला मिरवत हनुमान मंदिराच्या पारावर आणले.धुळवडीच्या दिवशी विड्यात जावयाला गाढवावरुन गावभर मिरवले जाते. तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला ८० वर्षांपूर्वी थट्टा मस्करीतून गाढवावर बसविण्यात आले होते. तेव्हापासून ही प्रथासुरू आहे. आतापर्यंत ८० जावयांना गाढवांवरून मिरवण्यात आले. गाढवाच्या गळ्यात चप्पल व बुटाची माळ घालून ढोल ताशांचा गजरात जावयाची मिरवणूक मारुतीच्या पारावर आणली जाते. तेथे जावयाला ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून मनपसंत कपड्यांचा अहेर केला जातो.यंदा विडा येथील सावळा पवार यांचे जावई बंडू पवार यांना मान मिळाला. त्याआधी गाढवावर बसवणार या भीतीने जावई बंडू पवार पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र तरुणांनी त्यांना घेराव घातला. मिरवणूक निघेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात आणून एकप्रकारे नजरकैदेत ठेवले. मिरवणूक निघाल्यावरही अर्ध्या रस्त्यात बसलेले गाढव काही उठेना. शेवटी तरुणांनी आपल्या खांद्यावर त्यांना मिरवत हनुमान मंदिराच्या पारावर आणले.मिरवणुकीसाठी जीवन गायकवाड यांचे गाढव विनामोबदला वापरले जात होते. ते गाढव दोन महिन्यांपूर्वी आजाराने मरण पावले. त्यामुळे हिवरापहाडी गावातून पैसे मोजून मिरवणुकीसाठी गाढव आणावे लागले.
गाढवाने मारली अर्ध्यावरच बसकण अन् गावकऱ्यांनीच जावयाला खांद्यावर मिरविले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:10 AM