कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पनवेल येथील ‘सनातन’च्या आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी साधकांच्या चेतासंस्थेवर प्रभाव टाकण्यास केला जातो. डॉ. तावडे व समीर गायकवाड हे नियमितपणे ही औषधे सेवन करीत होते, अशी कबुली गुन्ह्यातील साक्षीदार महिला डॉक्टर आशा ठक्कर हिने दिली. या औषधांच्या साठ्याचे आवक-जावक रजिस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यातील १ ते १४ पाने फाडून गायब केली. आश्रमामध्ये १७५ साधक आहेत. त्यांच्यासाठी साडेचार हजार औषधांच्या गोळ्यांचा साठा येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही औषधे तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचे ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तावडेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन आदेशानुसार पोलिसांनी त्याची सीपीआर वैद्यकीय तपासणी करून त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. तेथून कारागृह प्रशासनाच्या आदेशानुसार त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या. एसआयटी प्रमुख संजयकुमार गेले दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते. त्यांनी तावडेकडे कसून चौकशी केली.चौदा दिवसांच्या कोठडीमध्ये तावडेने आजारपणाचे बहाणे करून तपास यंत्रणेस सहकार्य केले नाही. त्याच्या सांगण्याप्रमाणे जबाब नोंदविला असताही त्याने स्वाक्षरी करण्यास विरोध केला. माझ्या वकिलांना विचारल्याशिवाय स्वाक्षरी करणार नाही, असे म्हणून त्याने पोलिस कोठडीतील वेळेचा जाणीवपूर्वक अपव्यय केल्याचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तावडेसह समीरकडूनही नार्कोटिकचे सेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 3:26 AM