मुंबई : दिल्लीच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांना येत्या आठवड्यात समोरासमोर बसवून त्यांची एकत्रित चौकशी केली जाईल, असे अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) वरिष्ठ सूत्रांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. समीर याने त्याच्या जाबजबाबात दिलेल्या माहितीची सत्यता या एकत्रित चौकशीने पडताळून पाहणे शक्य होईल. समीर याला याआधीच अटक झाली असून, सहा दिवसांची कोठडी संपत असल्याने त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाईल. ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंकज भुजबळ यांना याच आठवड्यात चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. तर या वेळी अगोदर पंकज यांची चौकशी केली जाईल. या दोघांकडून मिळणाऱ्या माहितीत काही विरोधाभास आहे का? ते तपासले जाईल. कंपनीत गुंतवण्यात आलेल्या रकमेचे स्रोत काय आहेत? व कंपनीच्या शेअर विक्रीबाबतही माहिती घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पंकज हे अनेक कंपन्यांमध्ये समीर यांच्यासोबत सह संचालक आहेत. तथापि, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात घेण्यात आलेल्या कथित लाचेचा या कंपन्यांशी काय संबंध आहे? याचाही तपास केला जाणार आहे. समीर यांची कोठडी वाढवून मागणार का? असे विचारता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत एक आढावा बैठक घेणार आहोत. त्यानंतरचा आम्ही यावर निर्णय घेवू. तथापि, समीर हे न्यायालयीन कोठडीत गेले तरी आम्ही चौकशीसाठी पुन्हा त्यांना ताब्यात घेऊ शकतो. अर्थात याबाबत नवे पुरावे मिळाल्यावरच हे पाउल आम्ही उचलू शकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.आणखी तिघे चौकशीच्या घेऱ्यात ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांनी मनी लॉड्रिंग प्रकरणात भुजबळ यांना मदत केली अशा तीन व्यक्तींवर आम्ही छापा मारला आहे. या तीन व्यक्तींबाबत अधिक भाष्य न करता या अधिकाऱ्याने सांगितले की, या तीन संस्थांबाबतची चौकशी सध्या महत्वपूर्ण टप्प्यांवर आहे. हे तिघे यापूर्वी चौकशीच्या कक्षेत आले नव्हते. समीर यांची ब्रेन मॅपिंग किंवा नार्को टेस्ट करण्याबाबत परवानगी मागणार का? असा सवाल केला असता याबाबत तूर्तास विचार नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मालमत्तांवर आणली टांच ईडीने गतवर्षी डिसेंबरमध्ये भुजबळांचा वांद्र्यातील रिकामा प्लॉट आणि सांताक्रूझ येथील नऊ मजली इमारतीवर टांच आणली. वांद्रे (पश्चिम) येथील सेंट मोनिका स्ट्रीटवरील या भूखंडावर हबीब मॅनोर व सॉलिटेअर नावाने नऊ मजली इमारत (किंमत ११० कोटी)उभी आहे. या मालमत्ता ईडीने हस्तगत केल्या. याआधी ईडीने चमणकर एंटरप्रायजेसची १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. ........
समीर व पंकज यांची समोरासमोर बसवून चौकशी
By admin | Published: February 08, 2016 4:41 AM