मुंबई : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सुरू असलेल्या उघड चौकशीला आज माजी खासदार समीर भुजबळ गैरहजर राहिले. समीर हे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. एसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज समीर यांना चौकशीसाठी वरळी येथील मुख्यालयात बोलावले होते. मात्र आजच्या चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी आगाऊ कळविल्याची माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यानुसार त्यांना पुढील तारीख कळविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. काल भुजबळ यांचे चिरंजीव पंकज यांची एसआयटीने सुमारे चार ते पाच तास कसून चौकशी केली व जबाबही नोंदवून घेतला होता. मात्र आज या प्रकरणात कोणाचीही चौकशी झालेली नाही, असे एसीबीतून सांगण्यात आले.आप नेत्या अंजली दमानिया आणि इतरांनी, भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांवर हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप करत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भुजबळ व कुटुंबीयांविरोधात उघड चौकशी सुरू केली. या चौकशीला राज्य सरकारनेही परवानगी दिली. एसीबीने या उघड चौकशीचा बंद लिफाफ्यातील पहिला प्रगती अहवाल गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाकडे धाडला आहे.
समीर भुजबळ चौकशीस गैरहजर
By admin | Published: March 04, 2015 2:13 AM