मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील उघड चौकशीचा पहिला प्रगती अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उच्च न्यायालयाकडे धाडला आहे. उद्या, शनिवारी तो उच्च न्यायालयासमोर सादर होईल. भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांची वरळी येथील एसीबी मुख्यालयात आज सुमारे तीन तास चौकशी झाली. समीर यांच्या चौकशीची ही तिसरी फेरी होती. आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया व इतरांनी भुजबळ कुटुंबीयांविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. भुजबळ कुटुंबीयांनी राजकीय वलय, अधिकारांचा वापर करून हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने एसीबीला विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.भुजबळ कुटुंबीयांविरोधातील आरोपांबाबत उघड चौकशी करण्यासाठी खंडपीठाने एसीबीला विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तसेच चौकशीचा प्रगती अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यास एसीबीला बजावले होते. (प्रतिनिधी)
समीर भुजबळांची तिस-यांदा चौकशी
By admin | Published: February 28, 2015 5:12 AM