मुंबई : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सीआयडीच्या हाती लागलेला एकमेव आरोपी समीर गायकवाड याच्याविरुद्ध आरोप निश्चिती करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या स्थगितीत शुक्रवारी ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. स्कॉटलँडकडून अद्याप फॉरेन्सिक रिपोर्ट न मिळाल्याने राज्य सरकारने गायकवाडविरुद्ध आरोप निश्चिती करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांसाठी एकच रिव्हॉल्वर वापरण्यात आल्याचा संशय महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांना आहे. याची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पुंगळ्या तपासणीसाठी पाठवल्या. सर्व पुंगळ्या एकाच रिव्हॉल्वरमधून झाडण्यात आल्याचा निष्कर्ष कलिना फॉरेन्सिक लॅबने काढला. तर कर्नाटकच्या फॉरेन्सिक लॅबने वेगळ्या रिव्हाल्वरमधून झाडण्यात आल्याचे अहवालात म्हटले. दोन्ही फॉरेन्सिक लॅबने वेगवेगळे निष्कर्ष काढल्याने सीबीआयने ठोस निष्कर्ष काढण्यासाठी स्कॉटलँड यार्डमधील फॉरेन्सिक लॅबचे मत मागवले आहे. मात्र यासाठी काही महिने लागणार असल्याने राज्य सरकारने गायकवाडविरुद्ध आरोप निश्चितीला स्थगिती देण्यात यावी, यासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र सत्र न्यायालयाने सरकारची मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली. (प्रतिनिधी)
समीरवर आरोप निश्चितीस मुदतवाढ
By admin | Published: June 25, 2016 3:27 AM