- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर विष्णू गायकवाड याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सशर्त जामीन मंजूर केला. सुनावणीवेळी समीर न्यायालयात हजर होता. कागदपत्रांची पूर्तता वेळेत होऊ न शकल्यामुळे त्याची कारागृहातून सोमवारी सुटका होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी दि. १७ जुलै रोजी होणार आहे.समीर गायकवाडला विशेष तपास पथकाने (एसआयटी) १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली होती. उमा पानसरे व शैलेंद्र मोरे या साक्षीदारांनी ओळख परेडवेळी विनय पोवार आणि सारंग अकोळकर या मारेकऱ्यांना ओळखले होते. त्यामध्ये समीर गायकवाडचा समावेश नसल्याचे साक्षीवरून दिसून आले. या दोघांच्या साक्षीमुळे अथर्व शिंदे याची साक्ष आपोआपच खोटी ठरत असल्याच्या मुद्द्यावरून त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही निर्बंध घातले आहेत. सुनावणी सुरू असतानाच न्यायाधीश बिले यांनी समीरला पुढे बोलावले, त्याला तुझा जामीन अर्ज मंजूर झाल्याचे सांगताना त्यासाठी अटी घातल्याचेही सांगितले. या वेळी समीरचे वकील समीर पटवर्धन, तपासी अधिकारी सोहेल शर्मा हे न्यायालयात उपस्थित नव्हते.गायकवाड याने सलग तिसऱ्यांदा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, पण तो विविध कारणास्तव फेटाळला होता. त्याच्या जामीनाला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अपिल दाखल करणार असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. कोणत्या मुद्द्यावर जामीन मंजूरअथर्व शिंदे याने समीरने गोळ्या घातल्याचे सांगितले होते, पण उमा पानसरे व शैलेंद्र शिंदे यांनी विनय पोवार व सारंग अकोळकर यांनी गोळ्या घातल्याचे ओळखपरेडमध्ये सांगितले. या दोन्हीही साक्षींत तफावत आढळते, तसेच पोवार व अकोळकर यांना या दोघा साक्षीदारांनीही हल्ल्याच्या आदल्या दिवशी परिसरात रेकी करताना पाहिल्याचे सांगितले.या खटल्याचा तपास सुरू राहू दे, पण मला जामीन द्या, असा समीरने न्यायालयात अर्ज केला होता.उच्च न्यायालयाच्या नवीन नियमानुसार, दोन वर्षांत प्रलंबित खटला (अंडरट्रायल) संपवायचा आहे, पण गेली २१ महिने समीर अटकेत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत हा खटला संपणे शक्य नाही. त्यामुळे समीरच्या नैसर्गिक हक्काचे हनन होत आहे, हेही न्यायाधिशांनी ग्राह्य धरले.न्यायालयाने घातलेले निर्बंध..- दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजेरी द्यावी.- न्यायालयीन कामाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यात त्यास प्रवेश करता येणार नाही.- पासपोर्ट असल्यास न्यायालयाकडे जमा करावा.-महाराष्ट्र सोडून कोठेही बाहेर जाऊ नये.