मुंबई : समीर गायकवाड याचा कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असणारे अनेक परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार असल्याने त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने समीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला.कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला समीर गायकवाड याने आपल्याविरुद्ध काहीही ठोस पुरावे नसूनही आपल्याला कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे, असे जामीन अर्जात म्हटले आहे. या अर्जावरील सुनावणी न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती. यापूर्वी दोनदा कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.‘गायकवाडविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे आहेत. तसेच १४ वर्षीय अथर्व शिंदे याची साक्ष नाकारण्याचा प्रश्न येत नाही. गायकवाडला अटक करण्यापूर्वीच त्याने पोलिसांपुढे जबाब नोंदवला होता. त्याची साक्ष ग्राह्य धरायची की नाही, हे खटल्याच्या वेळी न्यायाधीश ठरवतील. गायकवाडचा या हत्येमागे हात आहे, हे दर्शविणारे अनेक पुरावे तपासयंत्रणेकडे उपलब्ध आहेत,’ असे निरीक्षण न्या. बदर यांनी नोंदवले. राज्य सरकार या खटल्यावर स्थगिती मागून जाणुनबुजून विलंब करत आहे. त्यामुळे संविधानाने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या अधिकारांचा भंग होत आहे, असा युक्तिवाद गायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद फेटाळताना न्या. बदर यांनी म्हटले की, या खटल्यातील मुद्देमाल सीबीआयने स्कॉटलंड यार्डला पाठवल्याने सरकारने या खटल्यावर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. मुद्देमाल नसल्याने या खटल्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्जदाराच्या अधिकारांचा भंग होत नाही. (प्रतिनिधी)
समीर गायकवाडची जामिनावर सुटका नाही
By admin | Published: July 12, 2016 3:49 AM