कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीची मुदत आज, शनिवारी संपणार आहे. गेले अकरा दिवस पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत होते; परंतु त्याने तपासात शेवटपर्यंत सहकार्य न केल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकलेला नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलीस संशयित गायकवाडला सकाळी अकरा वाजता कसबा बावडा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश (क्रमांक ६) आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर करणार आहेत. यावेळी गायकवाडने हत्येचा कट रचण्यासाठी काय तयारी केली होती; या कटाचे धागेदोरे राज्यभर व आंतरराज्यीय पसरले आहेत. त्यामध्ये सहभाग असणाऱ्यांची नावे तो सांगत नाही, गुन्ह्णांंत वापरलेले पिस्तूल कुठून आणले, गोळ्या कुठून आणल्या, हत्येनंतर त्याची त्याने काय विल्हेवाट लावली, त्याला आणखी कुणी मदत केली याची माहिती देण्यास तो सहकार्य करीत नाही. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळपासून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी पोलिसांनी दर्शविली आहे. समीरला सांगली येथे त्याच्या निवासस्थानी छापा टाकून कोल्हापूर पोलिसांनी दि. १६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यावेळी त्या छाप्यात त्याच्या निवासस्थानी जप्त केलेल्या अनेक कागदपत्रांसह सुमारे ३२ मोबाईलच्या सीमकार्डांबाबतही तपासणी करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांत समीरकडे तपास करताना पोलिसांच्या हाती त्याचे मोबाईलवरील संभाषण हाच ठोस मुद्दा मिळाला आहे. गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग, संभाषण, कॉल डिटेल्स तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत तपासणी केली होती. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. हा अहवाल पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. समीर पोलिसांना तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने त्याची नार्को आणि ब्रेन मॅपिंग तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी त्याची स्वत:ची व न्यायालयाची मान्यता घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. आज, शनिवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मिळते अथवा न्यायालयीन कोठडी मिळते, यावर पोलीस निर्णय घेण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अधिकारी कागदपत्र रंगविण्यात व्यस्त पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये समीरची, तर तिसऱ्या मजल्यावर त्याची प्रेयसी ज्योती कांबळे हिची चौकशी आठ दिवस सुरू होती. यावेळी येथील वातावरण अतिशय धीरगंभीर होते. शनिवारी मात्र ज्योतीची ज्या खोलीत चौकशी सुरू होती, त्या खोलीचा बंद असणारा दरवाजा खुला होता.सहायक पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख व दोन महिला कॉन्स्टेबल तपासातील कागदपत्रांची जुळवाजुळव करीत होत्या; तर समीरच्या खोलीबाहेर चार कॉन्स्टेबल साध्या वेशात पहारा देत होते. पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्वतयारी करण्यात व्यस्त होते. न्यायालयीन कोठडीनंतर पुन्हा ताबा घेणारसमीरला कोठडी मिळाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यासाठी पोलिसांनी कारागृह प्रशासनाशी चर्चा केल्याचे समजते; परंतु तेथून त्याला न्यायालयाच्या परवानगीनुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे पोलीस, मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी गोवा पोलीस, तर डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी धारवाड पोलीस त्याचा ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समीर गायकवाडला आज न्यायालयात हजर करणार
By admin | Published: September 26, 2015 12:56 AM