कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२, रा. सांगली) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी हा आदेश दिला.शुक्रवारी त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पानसरे हत्येच्या तपासासाठी समीरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी विनंती केली होती. समीरला न्यायालयात हजर करण्यासाठी पुरेसे पोलीस पथक उपलब्ध नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करता येत नाही, अशा विनंतीचे पत्र पोलिसांनी न्यायालयासह कारागृह प्रशासनास दिले होते. त्यामुळे सुनावणीस समीर गायकवाड उपस्थित राहिला नाही. (प्रतिनिधी)ओळख परेडचा अहवाल सादरसमीर गायकवाडची ओळख परेड करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्यासमोर कळंबा मध्यवर्ती कारागृहात झाली. पानसरे यांच्या पत्नी उमा, त्यांची मोलकरीण, शेजारी राहणारी व्यक्ती व शाळकरी मुलगा अशा चौघांसमोर ओळख परेड झाली. समीरसह बारा संशयितांना समोर उभे केले होते. चौदा वर्षांच्या मुलाने बारा संशयितांच्या चेहऱ्यावर नजर फिरवीत समीरवर रोखल्यानंतर त्याच्या दिशेने बोट करून ‘हाच तो मारेकरी’ म्हणून त्यास ओळखले होते. ओळख परेडचा अहवाल तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयास सादर केला होता. तो अहवाल न्यायाधीश डांगे यांनी पोलिसांना दिला. हा अहवाल पोलीस दोषारोपपत्रामध्ये जोडणार असल्याचे समजते.
समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By admin | Published: October 24, 2015 3:21 AM