Nawab Malik News :राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचे आज निधन झाले. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि ते रुग्णालयात अनेक दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघातानंतर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. समीर खान यांच्या मृत्यूबाबत स्वतः नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोच्च स्थान देवो. समीर यांच्या जाण्याने आमच्या परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत."
दरम्यान, अपघातानंतर समीर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत होती, पण आज अखेर त्यांची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली. समीर खान, हे नवाब मलिकांची मोठी मुलगी निलोफर मलिक हिचे पती होते. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर व त्यांचे पती समीर खान क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नियमित आरोग्य तपासणीसाठी गेले होते.
तपासणी झाल्यानंतर घरी येण्यासाठी ते कारची वाट बघत उभे होते, त्यावेळी त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती. कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी हे गाडी घेऊन आले असता त्यांचा पाय अचानक कारच्या एक्सलेटरवर पाय ठेवला गेल्याने थार कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली. यात त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागला होता.
नवाब मलिक अन् त्यांची मुलगी विधानसभेच्या रिंगणातदरम्यान, नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मानखूर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.