डिप्पी वांकाणी, मुंबईराज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर आणि मुलगा पंकज यांनी इंडोनेशियात कोळसा खाणी खरेदी करण्यासाठी मदत घेतलेल्या ‘हवाला आॅपरेटर्स’चा छडा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लावला आहे. या व्यवहारासाठी भुजबळ यांनी सिंगापूरमध्ये स्थापन केलेल्या दोन कंपन्यांकडून चेकने दिल्या गेलेल्या रकमेखेरीज रोखीने दिली गेलेली रक्कम या ‘हवाला आॅपरेटर्स’मार्फत पाठविली गेली, असे समजते.‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की समीर व पंकज भुजबळ यांनी आणखी पाच भारतीय भागीदारांसह सिंगापूरमध्ये कंपन्या स्थापन केल्या. प्रधान, चंद्रकांत सकपाळ, थत्ते, अशोक जैन व आणखी एक असे हे भागीदार असून, या सर्वांना समन्स पाठविण्यात आली असून ते जबाब नोंदविण्यासाठी पुढील मंगळवारी येणार आहेत.याखेरीज भुजबळ यांनी स्थापन केलेल्या काही ‘डमी’ कंपन्यांशी पैशाचे व्यवहार केलल्या सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही जबाब नोंदविण्यासाठी बोलावले जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी भुजबळ व इतरांविरुद्ध येत्या बुधवारी औपचारिक गुन्हा (ईसीआयआर) नोंदविला जाईल, असेही सांगण्यात आले.या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की समीर व पंकज भुजबळ यांनी या पाच भागीदारांसोबत ‘आर्मस्ट्राँग ग्लोबल’ व ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर’ या नावांच्या दोन कंपन्या सिंगापूरमध्ये स्थापन केल्या. भारतातील ‘आर्मस्ट्राँग इंजिनीअरिंग’ या कंपनीकडून एकूण ३० कोटी रुपये सिंगापूरमधील या कंपनीकडे पाठविले गेले. सिंगापूरच्या या कंपन्यांमध्ये (पान ५ वर) भारताबाहेरचा कोणीही भागिदार नसल्याने आमच्या तपासाचा मुख्यरोख त्याच दिशेने असेल, असेही हा अधिकारी म्हणाला.ही रक्कम विदेशात पाठविताना रिझर्व्ह बँकेस कळविले गेले नव्हते त्यामुळे ते परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन ठरते, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, प्रचलित नियमांनुसार परदेशात स्थापन केलेल्या कंपन्यांकडे वर्षाला जास्तीत जास्त ७५ हजार डॉलर पाठविले जाऊ शकतात व तेही वैद्यकीय खर्च, तेथील मालमत्तांची देखभाल अशा कारणांंसाठी. हे पैसे सारस्वत बँकेच्या मार्फत सिंगापूरला पाठविले गेल्याने त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनाही ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र आम्ही आमच्याकडून नियमांचे होता होईतो पालन केले पण रिझर्व्ह बँकेस कळविण्याची जबाबदारी भुजबळांच्या कंपनीची होती, असे या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे समजते.सिंगापूरमध्ये सार्वजनिक व्यवहार अधिक पारदर्शक सचोटीने होत असल्याने तेथील कंपन्याशी सौदा करण्यास पसंती दिली जाते हे लक्षात घेऊन भुजबळ यांनी इंडोनेशियातील कोळसा खाणी खरेदी करण्याच्या व्यवहारासाठी सिंगापूरमध्ये कंपन्या स्थापन केल्या असव्यात, असे ‘ईडी’ला वाटते. इतर कंपन्यांचीही चौकशी-छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या इतर प्रकरणांत त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांच्या सर्व व्यवहारांची आम्ही चौकशी करीत आहोत. -छगन भुजबळ यांच्या पब्लिक फाउंडेशन ट्रस्टला पैसे देणाऱ्या इंडिया बुल्स आणि एल अॅण्ड टी, पीएनजी इत्यादी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. -भुजबळ कुटुंबीयांच्या ज्या कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात आहेत, त्यांत प्रवेश कन्स्ट्रक्शन्स, आर्मस्ट्राँग इंजिनीअरिंग, आर्मस्ट्राँग ग्लोबल, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर, भावेश बिल्डर्स, देविशा इन्फ्रास्ट्रक्चर, निश्च इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर व इंडीन फर्निचर या कंपन्यांचा समावेश आहे.
समीर, पंकज भुजबळ यांचे हवाला व्यवहार ‘ईडी’च्या रडारवर
By admin | Published: June 17, 2015 4:16 AM