अकोला : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. वानखेडेंवर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात आले होते. या पथकातील अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयातून त्यांच्या जातीसंदर्भातील दस्तावेजांच्या प्रमाणित प्रती घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे़. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अनुसूचित जाती अर्थात ‘एससी’ प्रवर्गाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकरी बळकावल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे़.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे व समीर वानखेडे यांच्या जातीच्या प्रमाणपत्रात घाेळ असल्याचा आराेप नवाब मलिक यांनी केला आहे़. त्यामुळे त्यांचे दस्तावेज तपासण्यासाठी मुंबई पाेलिसांचे एक पथक अकाेल्यात आले आहे़. वानखेडे कुटुंब मूळचे वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आहे. २६ जानेवारी १९९८ पर्यंत अकोला व वाशीम जिल्हा संयुक्त होता. अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याचे विभाजन झाले. त्यामुळे १९९८ पूर्वीच्या वाशीम जिल्ह्यातील नागरिकांच्या काही नोंदी आजही अकोला जिल्ह्यात महसुली दप्तरी नोंद आहेत. त्याअनुषंगाने मुुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात येऊन त्यांनी समीर वानखेडे व ज्ञानदेव वानखडे यांच्या जातीच्या संदर्भातील महसूल दस्तावेज ताब्यात घेऊन पथक मुंबईला रवाना झाले आहे.