कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने केलेला गौप्यस्फोट हा अतिरेक आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या गौप्यस्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश, तपास अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले आहेत.९ आॅक्टोबर रोजी न्यायालय परिसरात इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणाची सीडी पाहून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. हा चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला सांगितले. ब्रेन मॅपिंग चाचणीला तयार होण्यासाठी समीर गायकवाड याला २५ लाख रुपयांची आॅफर देण्याचा काहीच संबंध नाही. या चाचणीमध्ये तो दोषी निघेलच असे नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत अतिरेक करण्याची सवय आहे, असे संजयकुमार यांनी सांगितले. ९ आॅक्टोबरला ब्रेन मॅपिंग सुनावणीसाठी न्यायालयात समीरला हजर केले, त्यावेळी त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांकडे या प्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
समीरचा गौप्यस्फोट हा अतिरेक
By admin | Published: November 25, 2015 3:49 AM