समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धी'च्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. लोकार्पणाचा कार्यक्रम एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर पार पडला. या कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार मोठे कटआऊट लावण्यात आले होते. पहिले कटआऊट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, तिसरे कटआऊट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कटआऊट सर्वांत शेवटी चौथ्या क्रमांकावर होते. बाळासाहेबांच्या नावाने बांधलेल्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणात बाळासाहेबांचेच कटआऊट सर्वात शेवटी लावलेले पाहून तेथून जाणारा भाजपचा कार्यकर्ताही आश्चर्य व्यक्त करीत होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी आठ मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविली आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. राज्याच्या 'ईडी' सरकारचे जुनेच मंत्री हिवाळी अधिवेशनात कारभार हाताळणार आहेत. एकीकडे शिंदे गटाचे काही आमदार मंत्रिपदाच्या वेटिंगवर असताना तब्बल आठ मंत्र्यांना नव्याने खात्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. शंभूराज देसाई, दादाजी भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संदीपान भुमरे व गुलाबराव पाटील या मंत्र्यांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, भाजप, शिंदे गटाचे जे आमदार गत १०० ते १२५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून मंत्री पदाची आस लावून बसले आहेत, त्यांना अजूनही ताटकळत आहे.
(ही कुजबुज कमलेश वानखेडे, गणेश वासनिक यांनी लिहिली आहे.)
बैलगाड्यांचा व्हायरल व्हिडीओ...पंतप्रधानांचा दौरा, समृद्धीचे लोकार्पण आणि या मार्गामुळे होणारी वेळेची बचत याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सायंकाळनंतर समृद्धी महामार्गाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला. समृद्धी महामार्गावर चक्क बैलबंड्यांची रांग चालत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला हा दुसऱ्या महामार्गाचा व्हिडीओ वाटला. मात्र, पंतप्रधानांचे कटआउटस् व समृद्धीचे बॅनर्स दिसून आले व नेटीझन्सने यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.