मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी शेतजमिनीची अन्यत्र खरेदी करून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याचा आरोप खोटा ठरविला आहे.या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली त्यांना मिळालेल्या रकमेतून समृद्धीचा नवा मार्ग कसा खुला झाला याची आकडेवारीच एमएसआरडीसीने नेमलेल्या एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची प्रचंड आर्थिक प्रगती होत असताना त्यासाठी जमीन गेलेले शेतकरी देशोधडीला लागतील, अशी टीका होत होती. तथापि, आतापर्यंत देण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम आणि त्या रकमेचा शेतकºयांनी केलेला विनियोग बघता प्रकल्पग्रस्तांचेही आर्थिक परिवर्तन होत असल्याचे दिसते.एकूण ६४०० शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३८ टक्के शेतकºयांनी जमीन खरेदीतच पैसा गुंतविला. ६ टक्के शेतकºयांनी कृषीपूरक व्यवसायात (ट्रॅक्टर, बैलगाडी खरेदी, शेतात विहिरी खोदणे, सूक्ष्म सिंचन, शेतीला कुंपण घालणे) गुंतवणूक केली. १० टक्के शेतकºयांनी कृषी व्यवसायाव्यतिरिक्त (डेअरी, पोल्ट्री फार्म, किराणा) यात गुंतवणूक केली. ४५ टक्के शेतकºयांनी फिक्स्ड् डिपॉझिट, म्युच्युअल फंड, प्रवासी वाहनांची खरेदी, घरबांधणी वा प्लॉट खरेदीत पैसा टाकत समृद्धी साधली. ७४ टक्के शेतकºयांनी काही पैसा मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठीची तरतूद म्हणून गुंतविला. ७१ टक्के शेतकºयांनी आपल्या कुटुंबाला आधार व्हावा यासाठीही गुंतवणूक केली. ५० टक्क्यांहून अधिक शेतकºयांचा पुन्हा शेतजमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे या सर्वेक्षणात आढळले.भूसंपादन आणि मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे सांगत भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक होती, असे मत ९० टक्के शेतकºयांनी नोंदविले. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जाणार असून त्या दहाही जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ७५ टक्के संपादन आतापर्यंत पूर्ण झाले असून येत्या एक-दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ९० टक्के भूसंपादन झालेले असेल, असा विश्वास एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
समृद्धी महामार्गाने साधली समृद्धी, १६ हजार ७०० शेतकऱ्यांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई
By यदू जोशी | Published: April 06, 2018 4:39 AM