सांगली : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित समीर गायकवाडच्या सांगलीतील घरातून पोलिसांनी २३ मोबाईल हॅण्डसेट, एक कॅमेरा, रॅम्बो लोखंडी चाकू व बँक पासबुक जप्त केले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी घराची झडती घेतली. सांगली पोलिसांनी जप्त केलेला हा ऐवज गुरुवारी कोल्हापूर पोलिसांच्याताब्यात दिला.समीरचे येथील मोती चौकातील धनगर गल्लीत ‘भावेश्वरी छाया’ या नावाचे घर आहे. त्याच्या घराची झडती घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी घराची झडती सुरू झाली होती. घरात समीरची एक बॅग मिळाली. या बॅगेत विविध कंपन्यांचे २३ मोबाईल हॅण्डसेट, रॅम्बो लोखंडी चाकू, कॅमेरा, युनियन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील पासबुक, बेळगावच्या श्री माता को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे बचत पासबुक आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. बँक पासबुकवर २८ जानेवारी ते ४ एप्रिल या काळात चारवेळा व्यवहार झाल्याच्या नोंदी आहेत. खात्यावर केवळ चारशे रुपये आहेत. सनातन संस्थेचे प्रचार साहित्य व विविध धार्मिक पुस्तकेही सापडली आहेत. घरझडतीचे काम रात्री उशिरा पूर्ण झाले. पंचनामा करून मध्यरात्री दीड वाजता पोलीस घरातून बाहेर पडले. पंचनाम्याची प्रत समीरच्या कुटुंबास देण्यात आली आहे.
समीरच्या घरातून ‘सनातन’चे प्रचार साहित्य जप्त
By admin | Published: September 18, 2015 12:40 AM