मुंबई : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लवकर मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करावी. तसेच विद्यापीठ विभाजन व उच्च शिक्षण सुधारणा यासंदर्भातील डॉ.अनिल काकोडकर, डॉ. निगवेकर व डॉ. ताकवले समितीच्या शिफारशी अमलात आणाव्यात, अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची वार्षिक बैठक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रशिक्षण, कायार्नुभव व उमेदवारीमुळे युवकांची रोजगार क्षमता वाढते हा सार्वत्रिक अनुभव असल्याचे सांगत राज्यपालांनी युवकांसाठी सार्वजनिक व खासगी संस्था तसेच सरकारी विभागांमध्ये प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्याची सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
प्रस्तावित विद्यापीठ कायदा मंजूर करा
By admin | Published: February 25, 2015 2:36 AM