त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना आता पुन्हा खुले झाले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तरी महिलांच्या प्रवेशाबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सचिव निवृत्ती नागरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली. ३ एप्रिल रोजी मंदिराच्या गर्भगृहात सर्वांनाच प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारच्या बैठकीत हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच दर्शनाची परंपरा कायम ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. ३ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये निर्माण झालेल्या वातावरणाचे खापर गावकऱ्यांनी विश्वस्त मंडळावर फोडले. महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून पुरुषांनाही प्रवेश बंदचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्याने विश्वस्त मंडळाने हा निर्णय बैठकीत रद्द केला. या निर्णयामुळे मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांना प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला झाला. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या सूचना विचार घेता भाविकांना गर्भगृहात पूजा, अभिषेकासाठी सकाळी ६ ते ७ वेळ ठरविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना पुन्हा खुले
By admin | Published: April 11, 2016 3:25 AM