बोर्डी : येथील समुद्रकिनाऱ्यालगत अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा धंदा खुलेआम सुरू आहे. वाळू माफियांनी मांडलेला उच्छाद आणि गुंडगिरीला पाचबंद घालण्यासाठी वाळू तस्करांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील विधेयक पावसाळी अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले असतांना, डहाणूतील महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करण्याबाबत हतबल आहे.या किनाऱ्यावरुन प्रतिदिन २० ते २२ ब्रास रेतीची बेकायदेशीर वाहतूक केली जाते. डहाणू-बोर्डी सागरी मार्गापासून समुद्रात रेती भरण्याकरीता ट्रक व डंपरसाठी दगड, विटा, मुरूमाचा भराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात रेती भरून हा साठा सुरू बागेत ठेवण्यात येतो. नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी ही गावे प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. मात्र संबंधीत गावातील तलाठी, मंडळ अधिकारी डोळेझाक का करतात? तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी या कर्मचाऱ्यांवर कारवाई का करीत नाहीत? या प्रश्नांची उत्तर मिळत नाही. दरम्यान, या ठिकाणी रेती माफियांवर कारवाई झालेली प्रकरणं बोटावर मोजण्याइतकी आहेत. (वार्ताहर)
बोर्डी किनाऱ्याला रेती माफियांचा विळखा
By admin | Published: August 05, 2015 12:56 AM